गुरू रविदासांच्या विचारधारेचा मूळ स्रोत सांगणारे प्रा.डाँ.पी. एस.चंगोले यांचे समतावादी राजसत्तेचे पुरस्कर्ते गुरू रविदास एक समाज परिवर्तनवादी पुस्तक

guru ravidas

दि.१६ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या श्री संत शिरोमणी गुरू रविदास  महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रभावी जीवनकार्यावरील  कवी-लेखक-समाजप्रबोधनकर्ते
प्रा. अरुण बा.बुंदेले यांचा समीक्षणात्मक लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

संत कबीरांचे समकालीन -समविचारी,मिराबाईचे गुरू, मानवता धर्माचे पुरस्कर्ते ,समाजाला गुलामीच्या विरोधात विद्रोह करण्याचा संदेश देणारे महान संत, सामाजिक क्रांतीचे प्रणेते श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना आज माघ पौर्णिमेला असलेल्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
बहुजन चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते व संघटक, बहुजन चळवळीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांना महाराष्ट्र ,मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश ,गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश ,दिल्ली इत्यादी ठिकाणी मार्गदर्शनातून प्रशिक्षित कार्यकर्ता तयार करणारे मुख्य मार्गदर्शक, ओजस्वी वक्ते ,निर्भीड लेखक प्रा.डॉ.पी.एस.चंगोले  यांचे "समतावादी राजसत्तेचे पुरस्कर्ते गुरु  रविदास"हे पुस्तक वाचण्यातआले .या पुस्तकाचा समाज बांधवांसाठी श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या माघ पौर्णिमेला असलेल्या जयंतीनिमित्त थोडक्यात पुस्तक परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न करतो.

 dr p s changole

गुरू रविदास यांच्या समतावादी राजसत्तेच्या विचारधारेला प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ,प्रबुद्ध बहुजन भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी सामाजिक परिवर्तनाच्या राष्ट्रीय बहुजन चळवळीला गतिमान करणारे बहुजनांचे महानायक आदरणीय कांशीरामजी यांना हे पुस्तक समर्पित केलेले आहे .
         कर्मातून संत । बनले महंत।
         वादविवादात । यश प्राप्त ॥
अशा या संत शिरोमणी गुरु रविदासांचे जीवनचरित्र ,कार्य आणि तत्त्वज्ञान सतरा प्रकरणातून प्रभावीपणे प्रमाण भाषेत या पुस्तकात रेखाटले आहे. गुरू रविदास यांच्या समतावादी आणि बुद्धिवादी विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या पुस्तकाचे लेखन करण्यामागील प्रयोजन असल्याचे लेखक प्रा.पी.एस. चंगोले यांनी मनोगतामध्ये सांगितले आहे .

पहिल्या प्रकरणामध्ये अल्पसंख्य असलेल्या आर्य आक्रमकांनी बहुसंख्य असलेल्या बहुजनांना आपले राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक गुलाम बनविण्यात यश कसे मिळवले ते सांगितले आहे ." बहुजन हिताय बहुजन सुखाय "हा मूलमंत्रदेऊन समाजाला चिकित्सक चिंतनाची नवी दिशा तथागत गौतम बुद्धांनी दिल्याचे दुसऱ्या प्रकरणात नमूद केले आहे. भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगाचा काळ म्हणून सम्राट अशोकाचा काळ ओळखला जातो. सामाजिक परिवर्तनाची लढाई त्यांच्या काळात बहुजन समाजाने जिंकलेली होती.मनुष्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते उपाय राजसत्ता करू शकते ,हा विचार गुरु रविदास यांनी मांडला . मनुष्याचे जीवन हे विकसनशील असावे, परिवर्तनवादी असावे ,बुद्धिनिष्ठ असावे असा त्यांनी आग्रह धरल्याचे चौथ्या प्रकरणामध्ये सांगितले आहे.

जात ना  अनेक। एक आहे जात।    
नाव या जगात । मानवता॥ विषमतावादी समाजव्यवस्थेच्या लिखित घटनेला आव्हान देण्याचे धैर्य गुरू रविदास यांनी दाखविले. मनुष्याच्या गुणवत्तेनुसार त्याला माणूस म्हणून सन्मान मिळायला हवा ही गुरू रविदास यांची भूमिका होती. धार्मिक विचारांची वैज्ञानिक व मानवतावादावर आधारित मांडणी करून त्यांनी समाज मनाला गतिमान व परिवर्तनवादी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न  केल्याचे पाचव्या प्रकरणात सांगितले आहे आणि ते योग्य आहे कारण मनुष्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दुःखाची कारणे व दुःख मुक्ती चे उपाय शोधणारी विचारप्रणाली समाजाला देण्याचे ऐतिहासिक कार्य गुरू रविदास यांनी केलेले आहे.

      स्वयंप्रकाशित।व्हावे बहुजन।
       उच्च तत्त्वज्ञान। रविदास॥ सहाव्या प्रकरणात बहुजन समाजात नवचेतना निर्माण करणारे आणि समाजपरिवर्तनाचा पुरस्कार करणारे गुरू रविदास यांचे वास्तववादी  विचार व त्यांचे खरे चरित्र समाजासमोर मांडणे आणि त्यांचे लेखन करून ते समाजापर्यंत पोहोचविणे आज बहुजन समाजातील बुद्धिवंतांचे मुख्य कर्तव्य असल्याचे सांगितले आहे . हेच कार्य प्रा.चंगोले १९९५ पासून व्याख्यानातून ,अखिल भारतीय गुरु रविदास सत्यशोधक समाज या संस्थेतून, परिसंवादातून, ग्रंथ लेखनातून ,रविदास सत्यशोधक मासिकातून व विविध कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरातून सातत्याने करीत आहेत .त्यांच्या या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर समाजामध्ये दरवर्षी होणाऱ्या गुरू रविदास यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले , हे या पुस्तकाचे यश आहे असे म्हणता येईल.

                  गुरु रविदास यांचा जातिव्यवस्थेविषयीचा विचार सातव्या प्रकरणात सांगितला आहे. गुरू रविदास यांनी जातिव्यवस्थेचे अतिशय विकृत स्वरूप अनुभवल्यामुळे विषमतावादी समाजव्यवस्था बदलून सामाजिक समतेवर आधारित समाजरचना प्रस्थापित करण्याचा त्यांचा विचार अनेक दोह्यांतून दिसून येतो. हे या प्रकरणात सांगितले आह.
 उदा.जात जात में जात है।
            ज्यो केलन के पात॥
            रविदास न मानुष ।
            जौ लौ जात न जात ॥
                 "गुरु रविदासांची राजकीय विचारधारा  "या प्रकरणात गुरू रविदास यांनी राजकीय सत्तेविषयी आपले विचार परखड शब्दात कसे मांडले आहेत याविषयीचे येथे विवेचन केले असून राजकीय नेतृत्व "बहुजन हिताय बहुजन सुखाय " असे धोरण राबविणारे गुरू रविदास यांना अपेक्षित असल्याचे लेखकांनी सांगितले आहे म्हणून  मला  म्हणायचे आहे की ,
   सर्वा  मिळो अन्न। सम उच्च निच।असे हे राज्य असो। सुविचारांचं॥ "गुरु रविदासांची धार्मिक विचारधारा" या नवव्या प्रकरणामध्ये गुरू रविदास यांच्या मते , मनुष्य हाच धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. धर्माचे तत्वज्ञान मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी असले पाहिजे .धर्म हा मानवासाठी असून मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी धर्म तत्वज्ञान असले पाहिजे  हा महत्त्वपूर्ण विचार मांडून मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा धर्मातून मिळावी ,हे गुरू रविदास यांचे विचार त्यांच्या दोह्यांतून स्पष्ट झाले असल्याचे  या प्रकरणात सांगितले आहे म्हणून गुरू रविदास यांच्या मते ,
        मनुष्याचे कर्म । उच्च असा धर्म।
            उच्च नीच भेद । अमंगल कर्म॥ गुरु रविदासांची स्वाभिमान व स्वावलंबन विषयक विचारधारा  दहाव्या प्रकरणात सांगून बहुजन समाजातील सर्व संत विचारवंतांनी विषमतावादी समाज व्यवस्थेच्या विरोधात मानवी कल्याणासाठी विचार मांडल्याचे  सांगितले आहे.
            जगातील नष्ट होणाऱ्या भोग वस्तू पासून अलिप्त राहून सत्याचा शोध आणि अनुभूती करणाऱ्याला संत म्हणतात अर्थात संत कोणाला म्हणतात? याचे विवेचन  लेखकांनी अकराव्या प्रकारात केले आहे .संत म्हणजे महापुरुष ,सज्जन ,सदाचारी, सत्यवादी, संयमी, ध्येयवादी ,पवित्र ह्रदय, समदर्शी ,लोककल्याणकारी विचारांचे, मानवी मनाला नियंत्रित करणारे असतात. गुरू रविदास तत्कालीन काळातील समाजामध्ये असे महान संत शिरोमणी म्हणून पात्र ठरलेले होते ,हे येथे लेखकांनी आवर्जून सांगितले आहे .

          गुरू रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशात जरी झाला असला तरी त्यांचे कार्य त्यांनी उत्तरप्रदेशापुरते सीमित न ठेवता भारतभर भ्रमण करून स्वतःच्या लोककल्याणकारी तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार केला त्यामुळे प्रत्येक राज्यातील भाषेच्या उच्चारातील विविधतेमुळे गुरू रविदास यांची नावे रूढ झाल्याचे बाराव्या प्रकरणात लेखकाने सांगितले आहे उदा. बंगाली मध्ये रूईदास किंवा रुयदास, राजस्थानमध्ये रोहिदास, मराठीमध्ये रोहिदास किंवा रोहितदास ,पंजाबीमध्ये रैदास किंवा रेयीदास आणि हिंदीमध्ये रविदास किंवा रैदास .शिखांच्या गुरुग्रंथसाहेब मध्ये गुरु रविदासांची ४० पदे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत.
                गुरू रविदास यांचे विचार कोणत्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित झाले याचे उत्तर शोधताना लेखकांनी गुरू रविदास यांच्या पूर्ण विचारधारेचा अभ्यास केल्यावर एक ऐतिहासिक सत्य त्यांना दिसून आले की, तथागत गौतम बुद्धांची "बहुजन हिताय बहुजन सुखाय"  ही विचारधाराच गुरू रविदास यांच्या विचारांचा मूलभूत स्त्रोत असल्याचे सिद्ध होते असे तेराव्या प्रकरणात नमूद केले आहे .

                    गुरू रविदास यांच्या विचारधारेला मानणारे अनुयायी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे समर्थक यांची वैचारिक एकी घडून आल्यास भारतात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी गतिमान होण्यास फार मोठी मदत होईल असे लेखक १४व्या प्रकरणात खात्रीने सांगतात कारण गुरू रविदास आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे जातीव्यवस्था, बहुजन कल्याणकारी राज्य व्यवस्था, मानवतावाद या विषयीचे विचार समान आहेत .दोघांच्याही मनात बुद्धिवाद, विज्ञानवाद, बंधुत्व ,न्याय व समानता याविषयी कळकळ व तळमळ असल्याचे सांगून दोघांविषयी बहुजन समाजात नितांत आदर व श्रद्धा असल्याचे लेखक म्हणतात .आज  बहुजनांचे शक्तिशाली शासन प्रस्थापित करायचे असेल तर गुरू रविदास,गुरू कबीर,संत तुकाराम,महात्मा फुले,राजर्षी छ.शाहू महाराज व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनाच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करणारे
प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचे अवाहनच जणू लेखक येथे करतात
कारण त्यांनी शेकडो प्रबोधन शिबिरातून या महापुरुषांची विचारधारा हजारो कार्यकर्त्यापर्यत पोहोचवून  प्रशिक्षित कार्यकर्ते  तयार केलेले आहेत .

         राज्यकर्त्या समाजावर अन्याय, अत्याचार होत नसतात कारण राज्यकर्ता समाज हा शक्तिशाली असतो . समाजाचे प्रश्न सहज सोडवू शकतो म्हणून चांभार समाजाने हे मर्म समजून घेऊन एकत्र येण्याची गरज असल्याचे पंधराव्या प्रकरणात लेखकांनी नमूद केले आहे. लेखकाचे हे विचार हाच काळाची गरज आहेत.
               चर्मकार समाजाने आजच्या विज्ञान युगात जास्त चौकस होऊन सत्य काय आहे याचा शोध घेऊन सत्यशोधक बनण्याचा गौरव प्राप्त करून घेणे हा लेखकाचा सोळाव्या प्रकरणातील विचार महत्त्वपूर्ण वाटतो.तत्कालीन काळात जातीवर आधारलेली समाज व्यवस्था शूद्र अतिशूद्र यांना माणुसकीचे अधिकार नाकारत होती या विरुद्धचा गुरु रविदास यांचा संघर्ष इतिहासात वस्तुस्थितीला धरून नमूद करण्यात आला नाही याचा सतराव्या प्रकरणात आवर्जून उल्लेख केलेला आहे .
त्यांच्या जीवनकार्याच्या या ऐतिहासिक परिचयाचे दर्शन घडविण्याचे कार्य आणि त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्याला गतिमान करण्याचे कार्य गुरु रविदास सत्यशोधक समाजातर्फे सत्र प्रबोधन शिबिरातून परिसंवादातून सतत सुरू असल्याचे येथे सांगितले आहे . गुरू रविदास यांचे समाज परिवर्तनाचे आणि  समतावादी राज्यसत्ता निर्माण करण्याचे महान कार्य मा.कांशीरामजी  साहेबांनी केले. आज या ऐतिहासिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन लेखकाने येथे केले आहे.

 या पुस्तकाचे मुखपृष्ठ महत्त्वपूर्ण असून गुरू रविदासांची प्रबोधन मुद्रेतील प्रतिमा मुखपृष्ठावर देऊन ही प्रतिमा समाज बांधवांना पर्यंत पोहोचविण्याचे अनमोल कार्य लेखकांनी  केले आहे. ३६पृष्ठसंख्याअसलेल्या या पुस्तकाचे १० ₹  अल्पमूल्य असल्यामुळे  सर्वसामान्य वाचकांमध्ये प्रा.डाँ. चंगोले यांचे हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले व गुरु रविदास यांच्या विचारांचा प्रचार व प्रसारही भरपूर झाला व आजही होत आहे. सर्वसामान्य वाचकांना समजण्यासाठी प्रमाणभाषेचा वापर करुन प्रा.चंगोले यांनी सतरा प्रकरणातून गुरू रविदासांच्या विचारधारेची माहिती सुटसुटीतपणे  रेखाटलेली आहे.याशिवाय परिशिष्ट १ मध्ये गुरू रविदास यांचे समाज प्रबोधन पर  २५ दोहे ,परिशिष्ट  २  मध्ये गुरु कबीरांचे ४१दोहे ,परिशिष्ट 3 मध्ये संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे पंचवीस अभंग, परिशिष्ट ४  मध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे सुविचार तर परिशिष्ट ५  मध्ये  चर्मकार समाजातील जातीची यादी दिलेली आहे .माणगाव परिषदेतील महत्त्वाचा ठराव  आणि माझ्या कल्पनेतील भारत सम्राट अशोकाच्या भारतासारखा असेल हा मा.कांशीरामजी यांचा विचार मलपृष्ठावर प्रकाशित केलेला आहे. समाजबांधवांनी" समतावादी राजसत्तेचे पुरस्कर्ते गुरू रविदास "या पुस्तकाला आजपर्यंत मोठा प्रतिसाद दिला व यापुढेही देत राहतील अशी आशा व्यक्त करतो .लेखक प्रा. डॉ. पी. एस.चंगोले यांना पुढील संपूर्ण कार्यासाठी मी सुयश चिंतितो.

arun bundele


 

 

 

 

समीक्षक  प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले 

रुक्मिणी नगर, अमरावती .भ्र.ध्व. ८०८७७४८६०९ .

Post a Comment

0 Comments