गडकरींकडून सकारात्मक आश्वासन



वरुड / प्रतिनिधी:- मोर्शी मतदारसंघातील नागरिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित समस्या आणि विकासाच्या मागण्या लक्षात घेऊन शनिवारी (18 जानेवारी 2025) केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर यांनी भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील अपूर्ण प्रकल्प, पायाभूत सुविधा, अपूर्ण रस्ते, तसेच निंभी टोलसंबंधीच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मोर्शी मतदारसंघातील अपूर्ण रस्त्यांचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली. तसेच, नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. निंभी टोलच्या संदर्भातील नागरिकांची नाराजीही चर्चेत मांडण्यात आली, ज्यामुळे नागरिकांना प्रवासाचा त्रास होतो आणि आर्थिक भार सहन करावा लागतो. याशिवाय, मतदारसंघातील महत्त्वाचे प्रलंबित प्रकल्प आणि पायाभूत सुविधांमध्ये गती येण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे मतदारसंघाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळेल, असे सांगितले गेले. गडकरी साहेबांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. दरम्यान प्रकल्पांच्या अडचणी सोडवून त्यांना गती देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments