धर्माचे विष शिक्षण संस्थांमध्ये पेरले जाऊ नये

school classroom


नाशिक : समाजातील धर्मभेद दूर करण्याचे अलौकिक कार्य महात्मा फुले यांनी केले. मात्र अलीकडे धर्माधर्माचे विष विश्‍वविद्यालयात पसरविण्याचे काम केले जात आहे. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की हे विष विद्यार्थ्यांमध्ये न पेरता त्यांना शिक्षण करू द्या ,असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे दृकर्शाव्य माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, ब्रिटिशांनी महात्मा फुले यांना पुणे आयुक्त नेमले त्यावेळी शाळा, पाणी, रस्ते, दिवे यांचा विकास केला. यांच्या या कार्याबद्दल सत्यशोधक चळवळीचे केशवराव जेधे यांनी ठराव मांडला. या प्रस्तावाला अनेकांनी विरोध केला ४४ वर्षानंतर पुतळा बसविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे १९५१ साली अर्धाकृती पुतळा उभारण्याचे काम केले. 

 

महात्मा फुले यांनी १८४८ साली भिडेवाडा, बुधवार पेठ पुणे येथे भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून शिक्षिका केले. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. त्यामुळे आज देशातील स्त्री शिक्षित होऊन उच्चपदावर कार्यरत आहे हे केवळ महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झाले. 

 

फुले दाम्पत्याने सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख यांनी महिला आणि मुलींना शिकवण्याचे काम केले. फुले दाम्पत्या सोबत फातिमा शेख यांनी समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले. वर्ग, धर्म आणि लिंग मुळं शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.


फुले दाम्पत्याच्या या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नातून पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. सन २00४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. 

 

यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. ७ जून २0१४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सन २0१४ साली पुणे विद्यापीठाला देऊन विद्यापीठाचा गौरव केला. माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट २0१४ मध्ये पुणे विद्यापीठाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असा नामविस्ताराचा समारंभ पार पडला. या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला.

Post a Comment

0 Comments